• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

थांबलो होतो… पण हरलो नव्हतो…

Blog-Feb-2026-featured

आई आणि मुलगी एकाच वेळी देणार दहावीची परीक्षा…

जीवनात कधी थांबणे सोपे असते; पण पुन्हा उभे राहून शिक्षण सुरू करणे ही खऱ्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे.

ही प्रेरणादायी कहाणी सुरू झाली १० मे रोजी, जेव्हा प्रभात ट्रस्ट ने दैनंदिन रोजंदारी कामगारांसाठी “आता थांबायचं नाय” या चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो आयोजित केला.
चित्रपट पाहून प्रेरणा मिळते, पण कृती होत नाही हा समज या कष्टकरी कामगार भगिनींनी खोटा ठरविला. त्यांच्या आग्रहाखातर प्रभात ट्रस्ट आणि स्त्रीमुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्यांचे दहावीचे शिक्षण अर्धवट राहिले होते अशा महिलांसाठी “आता थांबायचं नाय” या विशेष अभ्यासवर्गाची सुरुवात प्रा. वृषाली मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ०६ जुलै २०२५, आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर वर्गाला प्रारंभ झाला. पाऊस, आजारपण, प्रवास, घरातील अडचणी या सर्वांवर मात करत हा शिक्षणप्रवास अविरत सुरू आहे.

या उपक्रमाला प्रशांत गाडेकर, सचिन आमडोस्कर, अजित खताळ, मधुकर वारभुवन, पल्लवी घारगे, निशा राठोड, आशा पाटील, अशोक गालवे आणि तुकाराम लोंढे या शिक्षकांची मोलाची साथ लाभली. प्रा. अजित मगदूम सर यांचे मार्गदर्शन आणि आशाताई गायकवाड यांचा समन्वय यामुळे हा उपक्रम अधिक सक्षम झाला.

Blog-Feb-2026-a

शिकवण्याबरोबरच परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या. शाळा सोडल्याचा दाखला मिळविण्यापासून गॅप सर्टिफिकेट तयार करण्यापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. पण जिद्द मात्र ढळली नाही. त्यांचा हा निर्णयच यशाची पहिली पायरी आहे.

या 30 ते 55 या वयोगटातील महिलांचे शिक्षण विविध कारणांनी खंडित झाले होते. आपली मुले दहावी, बारावी किंवा पदवीधर होताना पाहताना त्यांना आनंद होत असला, तरी स्वतःचे शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्यांच्या मनात होती. विशेष म्हणजे अक्षदा गायकवाड यांची मुलगी सृष्टी गायकवाड हीसुद्धा याच वर्षी दहावीची परीक्षा देत आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी दहावीची परीक्षा देत आहेत, ही खऱ्या अर्थाने प्रेरणादायी घटना आहे.

दहावीची परीक्षा ही केवळ शैक्षणिक टप्पा नाही; ती तुमच्या जिद्दीची, मेहनतीची आणि स्वप्नांवरील विश्वासाची साक्ष आहे.प्रत्येक अभ्यासाची रात्र आणि प्रत्येक संघर्ष उद्याच्या यशस्वी आयुष्याचा मजबूत पाया घालत आहे.

या प्रवासाच्या मुख्य टप्प्यावर, म्हणजेच दहावीच्या परीक्षेपूर्वी, या उपक्रमाचे पालकत्व स्वीकारलेल्या प्रभात ट्रस्ट ने विद्यार्थिनींना औक्षण करून शुभाशिर्वाद दिले.

Blog-Feb-2026-b

विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी “आता थांबायचं नाय” हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे ते उदयकुमार शिरूरकर (निवृत्त सहा. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका), गझलकार आप्पा ठाकूर, इं.रमेश भुतेकर, डॉ. वंदना कुचिक डॉ. आश्लेषा थोरात व प्रभात टीम उपस्थित राहिले.

वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले; त्यांचा वारसा जपत हा उपक्रम पुढे जात आहे.

विद्यार्थिनींची मेहनत यशात परिवर्तित होईल, याची आम्हाला खात्री आहे.
कारण त्या थांबल्या होत्या… हरल्या नव्हत्या…

चला, त्यांच्या या जिद्दीला आपल्या शुभेच्छांचे पाठबळ देऊया आणि दहावीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊया! 🙏💐📚✨

डॉ. प्रशांत भा. थोरात
नेत्ररोग तज्ञ
अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई
मो. 9769432224