आपला वाढदिवस फक्त स्वतःच्या आनंदापुरता मर्यादित न ठेवता, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी साजरा करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली…
माझे मुळगाव आणि आजोळ — मु.पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली. वडिलांना सहा भाऊ आणि एक बहीण… असा तब्बल ५०+ सदस्यांचा मोठा परिवार. माझ्या आजीने आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास करावा, अशी वडिलांची खूप इच्छा होती. पण ती इच्छा त्याकाळी पूर्ण होऊ शकली नाही… आणि कालांतराने दोघेही काळाच्या पडद्याआड गेले.
नवी मुंबईतील आमच्या नूतन वास्तू गृहप्रवेशाच्या निमित्ताने संपूर्ण थोरात परिवाराला विमानप्रवास घडवून आणण्याचा मनोदय केला. पहिल्यांदाच विमानात बसणाऱ्या माझ्या परिवारातील सदस्यांचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला होता. त्या आनंदाने गगनभरारी घेत कोल्हापूरहून थेट नवी मुंबई विमानतळावर थोरात परिवार दाखल झाला. वाढदिवसानिमित्त परिवाराला दिलेली ही एक आगळीवेगळी भेट ठरली…
पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू झाली…
गेल्या वर्षी १० मे २०२५ रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त “आता थांबायचं नाय” या चित्रपटाचा कचरावेचक महिला व दैनंदिन रोजंदारी कामगारांसाठी विशेष प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. आम्हाला वाटले — एक सुंदर इव्हेंट झाला… पण खरं तर तो एका नव्या मुव्हमेंटचा आरंभ ठरला!
माजी सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका श्री. उदय शिरूरकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहिल्यानंतर ३५ ते ६५ वयोगटातील अनेक महिला कामगारांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्या स्वप्नांना स्त्रीमुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्ट यांनी हात दिला.
प्रशांत गाडेकर, सचिन आमडोस्कर, अजित-पल्लवी खताळ, मधुकर वारभुवन, अशोक गालवे, आशा व निशा मॅडम यांनी ज्ञानदानाचे कार्य केले, तर आशा गायकवाड ताईंनी सर्वांचा सुंदर समन्वय साधला.
आणि नुकत्याच लागलेल्या बोर्ड परीक्षांच्या निकालात…
✨ श्रीमती आनंदी कांबळे — 65.20%
✨ प्रतीक्षा कीरतकुढवे — 62.00%
✨ चंदा पटेकर — 58.20%
✨ सोनाली कांबळे — 54.40%
✨ मंगल कांबळे — 51.40%
✨ सुनंदा पाठनुरे — 50.40%
✨ अक्षदा गायकवाड — 50.20%
✨ हेमा कांबळे — 44.80%
✨ मुक्ता राठोड — 39.40%
✨ रमा बगाडे — 38.20%
✨ संगीता आसवले — 37.20%
या सर्व भगिनींनी उज्वल यश संपादन करून आमचा विश्वास सार्थ ठरवला.
विशेष म्हणजे, या सर्व भगिनी गेल्या वर्षीच्या वाढदिवसाचे “रिटर्न गिफ्ट” म्हणून पेढे घेऊन आमच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाला आल्या होत्या. घरात कुटुंबाचा मोठा गोतावळा जमला होता… आणि या यशोगाथा ऐकून सर्वांनाच आनंदाचा व आश्चर्याचा धक्का बसला.
वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या कर्मवीर अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त या “रिटर्न गिफ्ट” ने तोंड गोड होण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो?
या उपक्रमातून अण्णांना खऱ्या अर्थाने कार्यांजली अर्पण झाली.
त्यांचे स्मरण करून प्रा. डॉ. अजित मगदूम, प्रा. वृषाली मगदूम, उदयकुमार शिरूरकर आणि भुतेकर यांच्या उपस्थितीत कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
खरंच…
स्वतःच्या आनंदापुरते न थांबता जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात आनंदाची भेट देतो, तेव्हा आयुष्य आपल्यालाही असे सुंदर रिटर्न गिफ्ट देत असते…
“वाढदिवस तुमचा… आनंद सर्वांचा…”
या प्रभातच्या घोषवाक्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्वीकार करून…
संकल्प करूया — यापुढेही अशाच नवनवीन उपक्रमांतून इतरांना आनंद गिफ्ट करू आणि त्यातून आयुष्याचे सुंदर रिटर्न गिफ्ट मिळवत राहू… ✨
— डॉ. प्रशांत भा. थोरात
नेत्ररोग तज्ञ
अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई
📞 9869432224
