शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा…
नवी मुंबईत झोपडपट्टीतील भाड्याच्या घरात ती आपल्या दोन लहान मुलांसोबत राहते.
मातापित्यांचा फाटका संसार त्यात पाच भावंडं त्यामुळे तिचं शिक्षण अर्धवट थांबलं. लग्न झालं, संसाराची स्वप्नं रंगवली, पण पती व्यसनाधीन निघाला. हळूहळू संसार उद्ध्वस्त झाला आणि तो घर सोडून निघून गेला…आज 15 वर्षांची दहावीला शिकणारी हुशार मुलगी व 6 वर्षांचा निरागस हसरा मुलगा यांची सर्वस्वी जबाबदारी तिच्यावर आली..
मुली बरोबरच दहावीची परीक्षा द्यायची यासाठी आता थांबायचं नाय या प्रभातच्या डॉ.वृषाली मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपक्रमातून पुन्हा शिक्षण सुरू केलं..मात्र 27 ऑगस्ट 2025 ला दौंड पोलिस स्टेशनकडून फोन आला “तुमचे पती यांचे निधन झाले आहे.” चार वर्षांपूर्वी हरवलेला माणूस अखेर मृत्यूच्या रूपाने परतला.. मुलांना घेऊन ती दौंडला गेली, सर्व विधी पूर्ण केले आणि पुन्हा मुलांसोबत आपल्या भाड्याच्या घरात परतली.. अवघ्या चार दिवसात 31 ऑगस्टला ती पुन्हा वर्गात आली. चेहरा पडलेला, डोळ्यात दुःखाची छाया. पण तिच्या ध्येयात थांबण्याची भाषा नव्हती. आयुष्याने अनेक कठोर परीक्षा घेतल्या तरीही ती प्रत्येक वेळी ठामपणे उभी राहिली..
कारण जीवन कितीही कठीण असलं तरी तिने ठरविले आहे आता थांबायचं नाय…
वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने कार्यांजली देण्यासाठी प्रभातने सुरू केलेल्या या उपक्रमात आपणही सहभागी व्हावे..शिक्षणाच्या वाटेवर परतलेल्या या दुर्गांना आपल्या मदतीचा हात खूप मोलाचा साथ देणारा ठरेल..
